कोल्हापूर : सायबर महाविद्यालयाच्या संगणक विभागामार्फत ‘इनोव्हेशन इन कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा उत्साहात समारोप झाला. या परिषदेत विविध देशांतील तज्ज्ञांनी ऑनलाइन सहभाग नोंदवत संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधन, नवकल्पना तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. परिषदेत सुमारे ५५ संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. समीर नाणीवाडेकर यांनी बीजभाषण केले. संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा आढावा घेत संशोधन व नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या दोन दिवसीय परिषदेत अमेरिका, ब्राझील, युक्रेन, तुर्की, व्हिएतनाम, इटली, मलेशिया आणि पोर्तुगाल यांसह विविध देशांतील तज्ज्ञांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला. त्यांनी संगणक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विविध विषयांवर आपले विचार मांडत उपस्थित संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध राज्यांतील प्रतिनिधीही या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परिषदेचा समारोप कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. के. मस्के यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर, संगणक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रजनी कामत, प्रा. मंहतेश पाटील आणि प्रा. मृदुला पाटकर उपस्थित होते. समारोपप्रसंगी डॉ. डी. के. मस्के यांचा सत्कार करण्यात आला.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे आणि सचिव सीए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. मंहतेश पाटील आणि प्रा. मृदुला पाटकर यांनी जबाबदारी सांभाळली. दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी पाटील यांनी केले, तर डॉ. श्रुती जामसांडेकर आणि डॉ. टी. व्ही. जी. शर्मा यांनी आभार मानले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा सहभाग, संशोधन निबंधांचे सादरीकरण आणि विविध विषयांवरील विचारांची देवाणघेवाण यामुळे ही परिषद संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.