Sunday, October 18, 2026
HomePoliticalशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार !...

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार ! शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा संकल्प

कोल्हापूर : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता तसेच महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा संकल्प भाजप-महायुतीचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी व्यक्त केला. इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

शिक्षक दिवसरात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी झटत असतात. मात्र, स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना अनेक आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. आजारपणात रुग्णालयाचा खर्च प्रथम स्वतःच्या खिशातून करून नंतर वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक असून, आर्थिक अडचणींमुळे उपचारांना विलंब होणे अन्यायकारक आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना नामांकित रुग्णालयांमध्ये कॅशलेस आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देणे, विम्याची उपचार मर्यादा पुरेशी ठेवणे तसेच विम्याशी संबंधित प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि त्रासमुक्त करणे यासाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. निरोगी शिक्षकच सुदृढ पिढी घडवू शकतो. त्यामुळे शिक्षकांना आरोग्याच्या चिंतेतून मुक्त करून अधिक समर्पित भावनेने अध्यापनाचे कार्य करता यावे, यासाठी आरोग्य सुरक्षा हा आपल्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा विषय असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रात मोठ्या संख्येने महिला शिक्षिका, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. रजस्रावाच्या काळात अनेक महिलांना तीव्र शारीरिक त्रास, थकवा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही त्या अध्यापनासह शाळा-महाविद्यालयांतील विविध जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा आणि शारीरिक गरजांचा विचार करणे ही काळाची गरज आहे.

रजस्रावाच्या काळात गरजेनुसार विशेष रजा उपलब्ध करून देण्यासाठी स्पष्ट आणि संवेदनशील धोरण असावे, ही भूमिका मांडत गावडे यांनी यासंदर्भात शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. ही रजा सहजपणे आणि सन्मानपूर्वक मिळावी, तसेच तिच्यामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या सेवा-नोंदीवर किंवा वेतनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक तरतुदी करण्याची मागणी करण्यात येईल.

महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणे हा संकोचाचा विषय नसून, तो त्यांच्या सन्मानाचा, आरोग्याचा आणि समान संधींचा प्रश्न आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रगत शिक्षण व्यवस्थेची ओळख आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

  1. शिक्षकांच्या आरोग्याची हमी, कुटुंबाची सुरक्षितता आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान या तीन महत्त्वाच्या बाबींचा विचार करून शिक्षण क्षेत्र अधिक संवेदनशील, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular