कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत महायुतीला धक्का दिला आहे. राज्यातील महायुतीचे मातब्बर मंत्री आणि दिग्गज नेते एका बाजूला असताना सतेज पाटील यांनी दिलेली कडवी झुंज निर्णायक ठरली. १३ विरुद्ध १२ अशा फरकाने समविचारी आघाडीने आघाडी घेतल्याने सतेज पाटील यांचा ‘जायंट किलर’ म्हणून राजकीय वर्तुळात बोलबाला सुरू झाला आहे. या निकालामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत जिल्ह्यातील ५ हजार ४१८ पात्र मतदारांपैकी तब्बल ५ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९९.९६ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची ठरलेली ही निवडणूक केवळ संचालक मंडळ निवडण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील वर्चस्वाची लढाई म्हणूनही पाहिली जात होती.
महायुतीच्या दिग्गजांना मतदारांचा दणका
या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भावनिक आवाहने आणि धार्मिक शपथांचा आधार घेत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र, निकालातून मतदारांनी वेगळाच कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे आणि हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने महायुतीच्या गोटात मोठी खळबळ उडाली. सहकार क्षेत्रातील अनुभव, राजकीय वजन आणि नेत्यांचा प्रभाव यापेक्षा मतदारांनी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे मानले, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष
गोकुळच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच सतेज पाटील यांच्या समर्थकांनी अजिंक्यतारा कार्यालय परिसरात जल्लोष केला. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिवाळी साजरी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या निकालामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला सहकार क्षेत्रात नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर ठामपणे उभे राहत सतेज पाटील यांनी मतदारांशी साधलेला संपर्क, समविचारी आघाडीची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे या विजयामागील महत्त्वाचे घटक ठरल्याची चर्चा आहे.
फेरमतमोजणीची मागणी फेटाळली
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आणि युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी हे अर्ज नामंजूर केले. त्यामुळे सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला.मोजलेले मतदान योग्य असून अधिकाऱ्यांनी मतमोजणीचे काम नियमानुसार केले आहे, अशी भूमिका निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. काही ठिकाणच्या मतमोजणीची पडताळणी करण्यात आली असता संबंधित उमेदवार मागे असल्याचे, तर काही ठिकाणी मतांची बरोबरी असल्याचे दिसून आले. मात्र, फेरमतमोजणीसाठी दिलेल्या अर्जांमध्ये नेमकी कारणे नमूद नसल्याने ते नामंजूर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोकुळच्या सत्तासमीकरणांना नवे वळण
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील या निकालामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दूध उत्पादक संस्था, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामीण भागातील मतदारांचा कौल राजकीय नेत्यांसाठी किती निर्णायक ठरू शकतो, हे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.
महायुतीच्या दिग्गज नेत्यांची ताकद, प्रतिष्ठा आणि राजकीय अनुभव यांना आव्हान देत सतेज पाटील यांनी मिळवलेले यश आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. गोकुळमधील सत्तेच्या समीकरणांवर या निकालाचा नेमका काय परिणाम होतो आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या संचालक मंडळाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.