पन्हाळा प्रतिनिधी (शहानवाज मुजावर):
दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून गावातील ग्रामदैवत श्री. रिद्धी,सिद्धी मंदिरात आरती केल्यानंतर पन्हाळगडावर सकल मराठा समाज यड्रावच्या वतीने ‘एक दिवा राजांसाठी’ हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. गेले तीन वर्ष स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यड्राव येथून किल्ले पन्हाळगडावर येत शिवमंदिरात महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
ज्यांनी रयतेला स्वराज्य दिले, स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली आणि सामान्य माणसाला न्यायाने जगण्याचा मार्ग दाखवला, अशा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आरती करून दिवे प्रज्वलित करण्यात आले.
या उपक्रमात सकल मराठा समाज यड्रावचे शिवाजी दळवी, इतिहासप्रेमी विजय माने, संदीप माने, शशिकांत कोकाटे, संतोष दावाडे, विनोद साळुंखे, रवी भोसले, कुणाल धुमाळे आदी सहभागी झाले होते.
‘एक दिवा राजांसाठी’ या संकल्पनेतून इतिहासाचे स्मरण, महाराजांप्रती कृतज्ञता आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्यात आला.