Sunday, November 29, 2026
HomePoliticalडिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा स्वागतार्ह; हसन मुश्रीफ यांच्याकडून भूमिकेचे समर्थन

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा स्वागतार्ह; हसन मुश्रीफ यांच्याकडून भूमिकेचे समर्थन

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने पाठिंबा दिल्याबद्दल राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी या भूमिकेचे मनापासून स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, महिला आरक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शनिवारी (दि. २८) इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी लोकसंख्येच्या आधारे खासदारांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला काही पक्षांचा विरोध होता. मात्र, आता सध्याच्या खासदार संख्येच्या दीडपट जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबत प्रत्येक खासदारामागे सहा आमदारांच्या जागाही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये महिला, अनुसूचित जाती आणि इतर आरक्षणांचाही समावेश असेल. त्यामुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्वाची संधी मिळून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. पवार यांच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असे ते म्हणाले.

वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

शरद पवार यांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा असल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली होती. पक्षातील मतभेद आणि पक्ष एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनाही सांगितले होते. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह आणि अशोभनीय असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, या विधेयकाचा उद्देश महिलांना आरक्षण देणे आणि आकाराने मोठे असलेले मतदारसंघ लहान करणे हा आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात; मात्र प्रत्येक मुद्द्यावर विरोधाला विरोध करणे योग्य नाही. खासदारांना १५० कोटी रुपये दिल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाबाबत विचारले असता, त्याचे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावे. हा आरोप सामान्य माणसांनाही पटलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या मतदारसंघांमुळे विकासाला मर्यादा

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, हा प्रस्ताव सर्वांच्या हिताचा आणि स्वागतार्ह आहे. काही लोकसभा मतदारसंघांमध्ये २४ ते ३० लाख मतदार आहेत. एवढ्या मोठ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत खासदारांना पोहोचणे कठीण होते. मतदारसंघांची संख्या वाढल्यास लोकप्रतिनिधींचा जनतेशी संपर्क वाढेल, विकासकामांना अधिक चांगला निधी मिळेल आणि विकासाला गती मिळेल.

काँग्रेसने भाजपविरोधात ‘देश विरुद्ध भाजप’ अशी मोहीम सुरू केल्याबाबत विचारले असता, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. मात्र, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काय होते, हे सर्वांनी पाहिले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवार गट महायुतीत येणार का?

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट महायुतीमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सावध भूमिका घेतली. भविष्यात काय होईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, डिलिमिटेशन विधेयकाला त्यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा असून, त्यांच्या भूमिकेचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular