शाहूवाडी ( प्रतिनिधी):
सरकारचे चुकीचे धोरण , शेतीक्षेत्रात भांडवलदारांचे वाढते आक्रमण , वन्यप्राण्यांचा उपद्रव्य , नैसर्गिक आपत्ती आणि मदतीचा अभाव , तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा अभाव या कारणांमुळे देशातील शेती व शेतकरी आर्थिक गर्तेत अडकत चालला असून या संकटांतून शेतक-यांना बाहेर काढणे हे आव्हान असून याकरिता शेतकऱ्यांनी संघटितपणे लढा उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शाहूवाडी येथे झालेल्या “शेती वाचवा – शेतकरी वाचवा” या परिषदेत बोलताना केली.
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशामध्ये १५० कोटी जनतेला दोन वेळा पुरेल एवढे अन्नधान्य निर्माण करण्याची क्षमता देशातील शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. शेती , शेतकरी आणि कामगार या घटकांचा देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे. मात्र केंद्र सरकारकडून शेती क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अहवालानुसार वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांचे जवळपास ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.
भारतीय शेती आणि शेतकरी सध्या अनेक नैसर्गिक, आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांचा सामना करत आहेत. हवामान बदलापासून ते बाजारपेठेतील अनिश्चिततेपर्यंत ही आव्हाने विविधांगी आहेत. यावेळी मा. आमदार सत्यजित पाटील सरूडकर , संपतबापू पाटील , भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोत्तम शर्मा , भाई भारत पाटील , कॅा. अतुल दिघे , कॅा. किशोर ढमाले , कॅा. राजेंद्र बावके , राजेंद्र गड्यान्नावर , सुरेश म्हाऊंटकर , उदय भाट , राजाराम मगदूम यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.