यवतमाळ : राज्यात विविध लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनांनी आधीच खळबळ उडालेली असताना, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
या गंभीर प्रकरणामागे मानवी तस्करीचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा अँगल असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या हाती लागलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये एका मुलगी आणि तिच्या प्रियकरामधील संभाषणातून मुलींना कशा प्रकारे फूस लावून नेले जाते, याचे संकेत मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
चव्हाण यांनी असा आरोपही केला आहे की, या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. तसेच, एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय, काही पोलिस अधिकारी आरोपींना मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत, अशा अधिकाऱ्यांना तपासातून दूर ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, आदिवासी मुलींच्या पालकांना पैशांचे आमिष दाखवून मुलींना फूस लावली जात असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘मानवी तस्करी’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ अशा विविध अंगांनी तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बेपत्ता मुलींचा शोध लवकरात लवकर लावावा, अशी मागणी होत आहे.