Tuesday, June 2, 2026
HomeCrimeपुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाई,महाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त

पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाई,महाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त

कोल्हापूर,दि. 02  : शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजी पेठ, महाकाली मंदिर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जिल्हा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या पथकाने 1 जून रोजी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत गॅस भरण्याच्या मोटारी, सिलिंडर्स आणि डिजिटल क्यूआर कोडसह सुमारे 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१ जून रोजी महाकाली मंदिर परिसरात एका ऑटो रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात तयार करून घटनास्थळी धाड टाकली.

पथकाने तात्काळ बाजूलाच असलेल्या एका कौलारू घराची झाडाझडती घेतली असता, तिथे हे बेकायदेशीर आणि जीवघेणे रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले. घटनास्थळावरून राजेंद्र चंद्रकांत मस्के (वय ४८, रा. लक्षतीर्थ वसाहत) आणि स्वप्निल शिंदे (वय १८ वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले असून, विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS 2023) कलम २८७ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा (१९५५) कलम ३ व ७ अन्वये कडक कायदेशीर गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे.

*चौकट: कोल्हापूर जिल्हा आणि शहरात कुठेही अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग, काळाबाजार किंवा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी सुरू असेल, तर पुरवठा विभाग त्यावर यापुढेही अशीच कठोर आणि दंडात्मक कारवाई करेल. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला देऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.*

या छाप्यात गॅस माफियांकडून ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञानही जप्त करण्यात आले आहे. तसेच २ HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारीः २ नग (किंमत रु. २०,०००), HPCL गॅस सिलिंडर्सः ३ रिकामे व २ भरलेले (किंमत रु. ११,५००), तोशिबा इलेक्ट्रिक वजनकाटा व वजनमापः किंमत रु. ५,२००,
डिजिटल पेमेंट साहित्य (Paytm स्कॅनर व QR कोड बोर्ड): किंमत रु. ६००, नोझल, पाईप आणि ५ मीटर केबल बोर्डः किंमत रु. १,५०० असे एकूण जप्त किंमतः ३८,८००/- रुपये

पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नम्रता कुडाळकर, तुषार पाटील, अभिजित खोत, लिपिक विपुल पाटील, जयवंत गोते, सुशीलकुमार खोंद्रे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular