कोल्हापूर प्रतिनिधी :
करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 12 लाख 46 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत शिंगणापूर येथील सांगावकर मळा परिसरात राहणाऱ्या सौ. अनुराधा संदीप पाटील यांच्या घराच्या टेरेसचा दरवाजा उचकटून घरातील वरच्या मजल्यावरील लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस नेण्यात आली होती. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 308/2026 अन्वये बीएनएस कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ऑक्सिजन पार्क, माळी कॉलनी, राजारामपुरी परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अदित्य संजय चौगुले (वय 26), विनोद शिवाजी कलकुटकी (वय 30) आणि शुभम राजेंद्र हेडगे (वय 28) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 18 हजार रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी संबंधित घरफोडीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सिद, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच त्यांच्या पथकाने पार पाडली.