Thursday, July 9, 2026
HomePoliticalशक्तीपीठ महामार्गाविरोधात १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची जाहीर सभा; वाकरी ते विठ्ठल मंदिर...

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची जाहीर सभा; वाकरी ते विठ्ठल मंदिर ‘सदबुद्धी यात्रा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप येणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील सुपीक शेतजमीन, बागायती क्षेत्र आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होतील, असा आरोप करत प्रकल्प तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथील वाकरी मैदानावर सकाळी ११ वाजता बाधित शेतकऱ्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर वाकरी ते विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची पायी ‘सदबुद्धी यात्रा’ काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी विठ्ठल चरणी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करणार आहेत. “शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन हिरावून घेणारा हा प्रकल्प तातडीने रद्द करावा,” अशी सामूहिक मागणी या यात्रेतून करण्यात येणार आहे.

राजू शेट्टी यांनी आरोप केला की, या महामार्गामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक शेती संपादित केली जाणार असून लाखो शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गाची गरज नसताना केवळ कंत्राटदार आणि भांडवलदारांच्या हितासाठी हा प्रकल्प राबवला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

महामार्गाविरोधात यापूर्वीही विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे, धरणे, ग्रामसभांमधील ठराव तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका स्तरावर विरोधाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारने अद्याप प्रकल्प अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केलेली नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी १८ जुलैची सभा महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सद्बुद्धी यात्रेला आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनातील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

हा लढा केवळ जमीन वाचवण्याचा नसून शेतकऱ्यांचे अस्तित्व, संस्कृती आणि रोजगार वाचवण्याचा असल्याचे सांगत, १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी, महिला, कष्टकरी आणि तरुणांनी १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाकरी (पंढरपूर) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी समन्वय समिती आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular