कोल्हापूर, ता. 10 जुलै : पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे शुक्रवारी पहाटे अज्ञात चार चोरट्यांनी दोन घरांची कुलपे तोडून घरफोडी करत सुमारे 23 हजार 300 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर चाकूने वार करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय देवानंद दमे (वय 31), मूळ रा. सातार्डे, ता. पन्हाळा (सध्या रा. दादर, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार तुकाराम शिंदे यांच्या सातार्डे येथील बंद घरांची कुलपे तोडून प्रवेश केला.
फिर्यादीच्या घरातून चांदीची गणपती मूर्ती, दुर्वाचा हार, जास्वंदीचे फूल तसेच दोन चांदीचे ब्रेसलेट असा 18 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. तर तुकाराम शिंदे यांच्या घरातून पाच सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 23 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
दरम्यान, चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीचा मित्र अवधूत अशोक भट (वय 37, रा. काळाचौकी, मुंबई) यांच्यावर आरोपींनी चाकूने हल्ला केला. त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या मागील बाजूस वार झाल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरगर करीत आहेत.