कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाच्या विविध प्रसंगांमध्ये आपल्या सुरेल संगीताने आनंदाची मेजवानी देणारे ऑर्केस्ट्रा कलाकार सातत्याने समाजात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा दुर्लक्षित राहतो. या कलाकारांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे ‘Melody and Challenges of Orchestra Players in Kolhapur’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) आर. के. कामत यांनी केले.
डॉ. दीपक भोसले आणि विकास अवघडे लिखित ‘Melody and Challenges of Orchestra Players in Kolhapur’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
कुलगुरू प्रा. (डॉ.) कामत म्हणाले की, ऑर्केस्ट्रा कलाकार विविध सामाजिक व सांस्कृतिक प्रसंगांमध्ये संगीताच्या माध्यमातून आपली भूमिका सातत्याने बजावत असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात संघर्ष हा कायमस्वरूपी दिसून येतो. समाजकार्य विषयातील संशोधक विकास अवघडे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. दीपक भोसले यांनी या वास्तवाचा धागा पकडून ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या जीवनातील विविध पैलूंवर संशोधनात्मक प्रकाश टाकला आहे.
या पुस्तकात केवळ कलाकारांच्या समस्या मांडण्यात आलेल्या नसून, त्यावरील उपाययोजनाही प्रभावीपणे सुचविण्यात आल्या आहेत. या सूचना भविष्यात प्रत्यक्षात अमलात आल्यास ऑर्केस्ट्रा कलाकारांचे दुःख व समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा दुर्लक्षित सामाजिक घटकावर संशोधनपर लेखन केल्याबद्दल त्यांनी लेखकांचे कौतुक केले.
यावेळी पुस्तकाचे सहलेखक विकास अवघडे यांनी प्रस्तावना सादर करताना या विषयाची माहिती संकलित करताना आलेले अनुभव संक्षिप्तपणे मांडले. डॉ. दीपक भोसले यांनी पुस्तक लेखनामागील उद्देश स्पष्ट करताना संशोधन केवळ ग्रंथालयापुरते मर्यादित न राहता ते पुस्तकाच्या स्वरूपात समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या लेखनातून समाजाचा या घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रकाशन कार्यक्रमास ॲड. डॉ. अश्विनी बाटे, पीएच.डी. संशोधक माधुरी भाले, सायबर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे आदी उपस्थित होते. पुस्तक निर्मितीसाठी कोल्हापूरातील ऑर्केस्ट्रा परिवारातील रवी सुतार, कुमार घोरपडे, राजू गोरड, मुकुंद सुतार, अमोल बुचडे, माधुरी बिरांजे, किशोरकुमार भारती, हिंदुराव अवघडे आणि संजय परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, सचिव सी. ए. ऋषिकेश शिंदे आणि संचालक डॉ. आर. के. टेलर यांचे प्रोत्साहन लाभले. सामाजिक समस्येवर आधारित हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचावे, यासाठी कोलकाता येथील एशियन पब्लिशिंग हाऊसने ते माफक किमतीत उपलब्ध करून दिले आहे.