कागल, प्रतिनिधी : रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त कागलमध्ये राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना लाडक्या माता-भगिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने स्नेह आणि आपुलकी व्यक्त केली. यावेळी माता-भगिनींनी पंचारतीने आपल्या लाडक्या भाऊरायाचे औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी बेलेवाडी मासा येथील माता-भगिनींसह प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहीणजींनीही मंत्री हसन मुश्रीफ यांची ओवाळणी करून त्यांना राखी बांधली. या प्रसंगी परिसरात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “माझ्या लाडक्या माता-भगिनींचे आशीर्वाद आणि त्यांच्या पुण्याईची कवचकुंडले कायम माझ्या पाठीशी आहेत. माता-भगिनींच्या अपार प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच माझी आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे.”
माता-भगिनींनी दाखविलेल्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने कागलमध्ये घडलेला हा भावनिक सोहळा उपस्थितांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.