Thursday, September 3, 2026
HomeCrimeकरवीर पोलिसांची ४८ तासांत दमदार कामगिरी; १८.९७ लाखांचे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने...

करवीर पोलिसांची ४८ तासांत दमदार कामगिरी; १८.९७ लाखांचे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत, चोरीचा गुन्हा उघड

कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ४८ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे १३८ ग्रॅम (सुमारे १३.८ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याने चोरीतील दागिने विकून मिळालेली रक्कम गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यात उधळल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आतिश संजय चौगुले (वय २६, रा. सूर्यनगरी, हनमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) यांच्या राहत्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ) प्रमाणे ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला या गुन्ह्याचा कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या.

तपासादरम्यान पोलिसांनी आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सूर्यनगरी, हनमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) याला अटक केली. सुरुवातीला तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने चोरीतील काही सोन्याचे दागिने विकून मिळालेली रक्कम गोवा येथे कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यात खर्च केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने पंचनाम्याने जप्त केले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये एक मंगळसूत्र, एक लक्ष्मीहार, सहा अंगठ्या, चार चेन, एक जोड कर्णफुले तसेच साखळीसह कानातील रिंगांचा एक जोड यांचा समावेश आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार तसेच पोलीस अंमलदार विजय तळसकर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रविण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल चव्हाण आणि आत्माराम शिंदे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular