कळे: डुकरांना मारण्यासाठी बॉम्ब लावण्यास विरोध केल्याच्या रागातून तरुणावर कटरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बाजारभोगाव (ता.पन्हाळा)
येथे २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय युवराज पाटील (वय ३०, रा. बाजारभोगाव, ता. पन्हाळा) याच्याविरुद्ध
सौरभ बाजीराव खवळे (वय २६, व्यवसाय शेती, रा. बाजारभोगाव) यांनी शनिवारी (दि.२६) कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, खवळे हे गावातील पाण्याच्या टाकीजवळ पाणी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अक्षय पाटील हा मोटारसायकलवरून तेथे आला. तो डुकरांना मारण्यासाठी बॉम्ब लावत असल्याचे दिसल्याने खवळे यांनी त्याला विरोध केला.
याचा राग मनात धरून आरोपी अक्षय पाटील याने सौरभ खवळे याला स्वतःची मोटारसायकल दिली व ती चालविण्यास सांगितले. त्यानंतर सरकारी दवाखान्याकडे जात असताना गाडीवर मागे बसलेल्या अक्षयने वाटेत सौरभच्या गळ्यावर कटरने वार करून जखमी केले. यावेळी मोटारसायकल खाली पडली. ‘ तू असं का करायला लागलास?’ असे फिर्यादी सौरभ खवळे याने आरोपी अक्षय पाटील याला विचारले असता, आरोपीने शिवीगाळ करून ‘आम्ही जे करणार ते तुम्ही बाहेर काढणार काय, लोकांना सांगणार काय, तुम्ही मांगाची, आम्हाला वरचढ होणार काय, तुमची मांगांची चार घरे आहेत, ती वडिंगेत पेटवली तशी पेटवून टाकीन. मी आजपर्यंत लय जनास्नी गाठून मारल्यात.’ अशी धमकी दिली व हातातील कटरने फिर्यादीच्या डाव्या दंडावर व उजव्या तळहातावर वार करून जखमी केले. तसेच, घटनेबाबत कोणाला सांगितल्यास आई-वडील व भाऊ- बहीण यांना गाठून मारण्याची धमकी दिली.
कळे पोलिस ठाण्यात याप्रकरणी सपोनि दीपक कदम यांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा तपास करीत आहेत.