Wednesday, September 30, 2026
HomeEducationसायबर महाविद्यालयामध्ये ‘एम्पॉवरिंग एज्युकेटर्स’ शिक्षक परिषद उत्साहात संपन्न

सायबर महाविद्यालयामध्ये ‘एम्पॉवरिंग एज्युकेटर्स’ शिक्षक परिषद उत्साहात संपन्न

कोल्हापूर : दि. 30 सप्टेंबर २०२६ — कोल्हापूर चॅप्टर ऑफ वेस्टर्न इंडिया रीजन (WIRC) ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) यांच्या वतीने छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, कोल्हापूर येथे ‘Empowering Educators’ या संकल्पनेवर आधारित शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सेमिनार हॉल-१ येथे ही परिषद उत्साहात पार पडली.

या परिषदेत शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. व्यावसायिक विकास, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उच्च शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच भावी व्यावसायिक घडविण्यामध्ये शिक्षकांची बदलती भूमिका यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

परिषदेचे प्रमुख वक्ते व Keynote Speaker डॉ. आर. के. टेलर यांनी ‘Use of AI in Higher Education’ या विषयावर मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी व जबाबदार वापर, अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत AI मुळे होणारे बदल तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याबाबत त्यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहून त्याचा शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सौ. शोभा अरविंद यांनी ‘Life Skills Management’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये जीवन कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, निर्णयक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती यांसारख्या जीवन कौशल्यांचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला ICSI कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सीएस स्वप्निल पाटोळे, सचिव सीएस ज्योतिबा गावडे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर, अधिष्ठाता डॉ. बिंदू मेनन, सौ. शोभा अरविंद आणि सीएस पीयूष काळे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएस विधी ओसवाल, ललिता नायडू आणि मैथिली संतोष यांनी केले. विविध सत्रांमधून उपस्थित शिक्षकांना व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातील बदल, उच्च शिक्षणातील AI चा वापर, जीवन कौशल्य व्यवस्थापन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक आव्हानांसाठी तयार करण्याबाबत उपयुक्त माहिती व मार्गदर्शन मिळाले.

परिषदेच्या समारोपप्रसंगी सीएस कृष्णात चौगले यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी मान्यवर, वक्ते, उपस्थित शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

ICSI कोल्हापूर चॅप्टरच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच व्यावसायिक शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देणारी ही परिषद ज्ञानविनिमय, व्यावसायिक संवाद आणि शैक्षणिक सहभागासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

“Empowering Educators, Inspiring Future Professionals” या संदेशाने परिषदेचा समारोप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular