Wednesday, October 14, 2026
HomePoliticalसीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

पुणे / कोल्हापूर : सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच ११ महिन्यांची नियुक्ती मिळणे, मूळ वेतन, रजा आणि सेवास्थैर्य यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी मंगळवारी सांगितले.

गावडे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान विविध शैक्षणिक संस्थाना भेटी देत, प्राध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी प्राध्यापक आणि शिक्षकांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी गावडे यांच्याकडे मांडल्या.

कौस्तुभ गावडे म्हणाले की, राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मानधनातील मर्यादा, नियुक्तीतील अनिश्चितता आणि सेवाविषयक सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागतो. अनेक वर्षे अध्यापन करूनही त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळत नसल्याने आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांबाबत धोरणात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

सीएचबी प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ११ महिन्यांची नियुक्ती मिळावी, यासाठी मुलाखतींची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र प्राध्यापकांना ॲड-हॉक पूर्णवेळ नियुक्ती आणि मूळ वेतन देण्याबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

नियमित नियुक्ती प्रक्रियेत लागू नियमांनुसार सीएचबी सेवाकाळातील अनुभवाला प्राधान्य देणे, हक्काच्या आणि वैद्यकीय रजा उपलब्ध करून देणे, तसेच प्राध्यापकांच्या संशोधन आणि प्रकाशित शोधनिबंधांना योग्य मान्यता देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) वाढलेला अध्यापन कार्यभार लक्षात घेऊन आवश्यक प्राध्यापक पदांना मान्यता देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. सीएचबी प्राध्यापकांचे प्रश्न केवळ मानधनवाढीपुरते मर्यादित नसून, ते सेवास्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित आहेत. या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.
……
*प्रतिक्रिया*
…..
‘सीएचबी प्राध्यापक हे उच्च शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. अनेक वर्षे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना आर्थिक सुरक्षितता आणि सेवास्थैर्य मिळणे आवश्यक आहे. मानधनवाढ, ११ महिन्यांची नियुक्ती, मूळ वेतन, रजा आणि सेवाकाळातील अनुभवाला योग्य मान्यता मिळावी, यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार आहे. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर धोरणात्मक उपाययोजना करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular