Thursday, October 22, 2026
HomeEducationस्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अद्ययावत राहणे गरजेचे : उदय महाजन

स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अद्ययावत राहणे गरजेचे : उदय महाजन

कोल्हापूर : सध्याचे युग स्पर्धेचे असून या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवण्याबरोबरच आवश्यक कौशल्ये, कलागुण आणि ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करून आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी उदय महाजन यांनी केले.

सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य महाविद्यालयामार्फत शहरी व ग्रामीण विकास शाखेच्या विद्यार्थी विकास मंचाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाजन म्हणाले की, शासन स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या संधींचा लाभ घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती घ्यावी. तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.

आपल्या मार्गदर्शनामुळे आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी केली. विद्यार्थी विकास मंचाची स्थापना विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी. शर्मा यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रयत्न केल्यास यश मिळवणे सोपे होते, असे प्रतिपादन केले. किर्लोस्कर कंपनीचे सामाजिक बांधिलकी उपक्रम अधिकारी शरद अजगेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा होस्मनी यांनी केले, तर गौरव पाटील यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. पूनम माने, प्रा. संध्या तळेकर, प्रा. वसीम सय्यद यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सायबर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे, सचिव सीए ऋषिकेश शिंदे आणि विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. सुरेश आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular