कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून पोलिसांच्या तपासानंतरही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एखाद्या गंभीर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली आहे का, अशी भीती व्यक्त होत आहे.
महेश पिळणकर हे ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे दाखल होऊन दोन महिने उलटले तरीही त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कोणताही ठोस धागादोरा लागलेला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर आठ दिवसांनी त्यांची दुचाकी परिसरातील एका शेतात आढळून आली. त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर काहीतरी जाळल्याच्या खुणाही पोलिसांना सापडल्या. मात्र त्यापलीकडे तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज कुटुंबीय आणि मित्रांनी दसरा चौक कोल्हापूर येथे आंदोलन करत पोलिसांविरोधात निदर्शने केली. तसेच त्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल आणि जलद तपास करण्याची मागणी केली.
महेश पिळणकर यांचा परिसरातील राजकारणात सक्रिय सहभाग होता. आगामी पंचायत समिती निवडणूक त्यांनी लढवावी असा आग्रह त्यांच्या मित्रांकडून होत होता. त्यामुळे या प्रकरणामागे कोणता गंभीर कट आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. दोन महिने उलटूनही कोणताही ठोस तपास लागलेला नसल्याने जिल्ह्यात या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.