जागतिक पातळीवरील इराण इजराइल युद्धाचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने देशात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे, तर सामान्य पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत.
देशातील प्रमुख इंधन कंपन्या जसे की Indian Oil Corporation, Hindustan Petroleum आणि Bharat Petroleum यांनी त्यांच्या प्रीमियम इंधनांच्या दरात 2 ते 2.30 रुपयांची वाढ केली आहे. ही नवीन दररचना 20 मार्चपासून लागू करण्यात आली आहे.
या वाढीनंतर दिल्ली मध्ये प्रीमियम पेट्रोलचा दर 107 रुपयांवरून 112.30 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबई मध्ये हा दर 115 रुपयांवरून 120.30 रुपये झाला असून चेन्नई मध्ये 117.30 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे.
मात्र, सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नॉर्मल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत पेट्रोल 103.50 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.03 रुपये आहे, तर दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
प्रीमियम पेट्रोल हे उच्च ऑक्टेन (95+) असलेले इंधन असून ते वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवते. विशेषतः स्पोर्ट्स बाईक, टर्बो इंजिन आणि उच्च कार्यक्षमतेच्या कारसाठी याचा वापर केला जातो. सामान्य पेट्रोलचा ऑक्टेन नंबर साधारण 91 असतो.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा इंधन दरांवर होणारा परिणाम पाहता, येत्या काळात सामान्य पेट्रोलच्या दरातही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.