कोल्हापूर | प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन महिला एजंटना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील हा पोलिसांना चकवा देत पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्याअनुषंगाने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
शनिवार (२६ जुलै २०२६) रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये स्वप्निल केरबा पाटील हा एजंटमार्फत आणलेल्या गर्भवती महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान स्वप्निल पाटील हा तपासणी करून कारमधून निघताना दिसला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्याने एका महिलेला कळंबा चौकात उतरवून भरधाव वेगाने पलायन केले.
पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली असता, तिला मनिषा दिनकर कांबळे (वय ३७, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगरी) हिने गर्भलिंग तपासणीसाठी आणल्याचे उघड झाले. तसेच आणखी दोन महिलांना अश्विनी गजानन शिंदे (वय ३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) हिने आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दोन्ही महिला एजंटना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात एजंट किरण चव्हाण, संतोष कोळी, तसेच बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीसाठी लॉज उपलब्ध करून देणारा थ्री स्टार लॉजचा मालक यांच्यासह एकूण सात आरोपी निष्पन्न झाले आहेत.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम आणि PCPNDT कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.