Monday, July 27, 2026
HomeUncategorizedकेडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीच,अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे सकारात्मक...

केडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीच,अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे सकारात्मक पाऊल

कोल्हापूर, दि. २७:
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला केलेल्या अर्थपुरवठ्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केडीसीसी बँकेला रू. १३ लाख, ३० हजारांचा दंड लावलेला होता. हा सर्व दंड अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनीच भरला. या कृतीतून कार्यकर्त्यांनी नेत्यावरील अपार प्रेमाची आणि निष्ठेची प्रचिती दिली. शेतकऱ्यांनी टाकलेल्या या सकारात्मक पावलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.

याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेला तोशीस लागू नये म्हणून हा दंड माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी स्वतः भरण्याचे जाहीर केले होते. दरम्यान; घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि. २४ जुलै रोजी कारखाना कार्यस्थळावर व्यापक बैठक घेऊन हा दंड सभासद शेतकऱ्यांच्यावतीने भरण्याचे जाहीर केले. त्यानंतर गेली दोन दिवस शेतकऱ्यांनी ही रक्कम गोळा करून सोमवार दि. २७ रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा केली.

शेतकऱ्यांसमोर बोलताना माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँक जीवापाड जपली आणि वाढविली आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने चालविल्यामुळे रू. १३, ००० कोटी ठेवी आणि कोट्यावधी रुपयांच्या नफ्यात आहे. अशा बँकेला आपल्या कारखान्यामुळे दंड होवू नये म्हणून मी हा दंड स्वतः भरण्याचे जाहीर केले होते. परंतु; आमच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी हा दंड वर्गणी काढून आज रोजी भरला त्याबद्दल मी त्यांचा अंतकरणपूर्वक आभारी आहे.

*सहकार चळवळीला एक नवा आदर्श- मंत्री श्री. मुश्रीफ*
या संदर्भात बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बँकेचा अध्यक्ष या नात्याने मी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे. केडीसीसी बँकेला कसलीही दोषीस लागू नये म्हणून शेतकऱ्यांनी दंडाची ही रक्कम स्वतः वर्गणी काढून भरली. वास्तविक; अन्नपूर्णा साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्यानंतर सव्वापाच वर्षांनी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड झालेली आहे. यामध्ये माजी आमदार श्री. घाटगे यांची अगर अन्नपूर्णा साखर कारखान्याची कोणतीही चूक नाही. फक्त ही तांत्रिक चूक राहून गेली होती. परंतु, आरबीआयने लावलेला हा दंड शेतकऱ्यांनी भरून माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांच्या सर्वच शेतकरी कार्यकर्त्यांनी सबंध सहकार चळवळीलाच हा एक आदर्श घालून दिला आहे.

*अन्नपूर्णा कारखाना हे आमच्या श्रमाचे मंदिर…..*
शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना माजी आमदार श्री. घाटगे म्हणाले, हा दंड आज जरी तुम्ही सर्व शेतक-यांनी भरला असला तरी तो मी माझ्यावरील कर्ज समजतो. मी हे कर्ज लवकरात लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करीन. यावर कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे घोषणा दिल्या. “बाबा, हे तुमच्यावर कर्ज नाही, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.” “अन्नपूर्णा साखर कारखाना हे आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे, या भावनेपोटी आम्ही ही रक्कम जमा केली आहे.” “१३ लाख काय, तेरा कोटी लागले तरीही आम्ही ते जमा करू,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

के. के. पाटील, रणजित मुडूकशिवाले, ज्ञानदेव पाटील , बापूसो पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी ए. वाय. पाटील, एम. बी. पाटील, दिनकर दौलू पाटील, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, विश्वासराव दिंडोर्ले, विलास पाटील, मल्हारी पाटील, तानाजी पाटील, राजू भराडे, दिलीप चौगले, प्रदीप पाटील यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नामदार चंद्रकांतदादा पाटलांचा विजय असो, मंत्री हसन मुश्रीफ साहेबांचा विजय असो, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा विजय असो, अंबरिशदादांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी बँकेचा परिसर दणाणून सोडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular