दोनवडे:
खुपिरे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) : मोगरबन अॅग्रो प्रोडक्ट प्रा. लिमिटेड, खुपिरे यांच्या वतीने महिलांसाठी एक दिवसीय मोफत शेळीपालन, बकरीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण वर्ग रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत न्यू हायस्कूल, खुपिरे येथे होणार आहे.
श्री. बंडोपंत बाळू हराळे व सौ. योगिता बंडोपंत हराळे यांच्या पुढाकारातून हा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, महिलांनी शेतीपूरक व्यवसाय उभा करून कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. शून्य ज्ञानापासून ते कुशल पशुपालक होण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षणात शेळी, बकरी व कोंबडी यांच्या जातींची निवड, शेड मॅनेजमेंट, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण व लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, वजन वाढ व फॅटनिंग तंत्र, खर्च-नफा गणित, मार्केटिंग व विक्री मार्गदर्शन तसेच शासकीय अनुदानित कर्ज योजनांची माहिती दिली जाणार आहे.
यासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये शेड व उपकरणांची माहिती, शेळ्यांचे टॅगिंग, खुर/नखे कापणे, ड्रेचिंग गनद्वारे औषध देणे, विविध प्रकारची इंजेक्शन पद्धती (S/C, I/M, I/V), बोकडांची नसबंदी (बर्डिझो पद्धत), केस कापणे व ताप तपासणी आदी विषयांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना चहा-नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात येणार असून, नोट्स, स्टडी मटेरियल, पुस्तके, प्रशिक्षण किट, औषधे, ओळखपत्र तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्र मोफत दिले जाणार आहे. पशुवैद्यकीय सपोर्टही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी डॉ. कन्हैया मारुती चव्हाण (पशुधन अधिकारी) व डॉ. रूपसिंग तेजसिंग खानविलकर (फलटण, सातारा) मार्गदर्शन करणार असून, त्यांना शेळी-मेंढी संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे.
हे प्रशिक्षण फक्त ५० महिलांसाठी मर्यादित असून, इच्छुकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९७६५१९६०७० किंवा ९०६७४९४९८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.