Thursday, April 16, 2026
HomeAdministrationकोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला बोर्डाची मंजुरी; ३,८३८ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला बोर्डाची मंजुरी; ३,८३८ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील

कोल्हापूर प्रतिनिधी:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. १०७ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ३,८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून Konkan Railway बोर्डाने शनिवारी यास मान्यता दिली. केंद्रीय मंत्री Suresh Prabhu यांनी दूरध्वनीवरून ही माहिती दिली. तसेच या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वैभववाडी येथील आर्थिणे ते कोल्हापूर असा हा एकूण १०७ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके प्रस्तावित असून, कोल्हापूर मार्केटयार्ड, बापट कॅम्प, कसबा बावडा, कळे, भुये, आसुले, पोळे, सैतवडे, भूतलवाडी, उपळे आणि वैभववाडी अशी स्थानके असतील. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेकडे देण्यात आली आहे. मार्गाचे सर्वेक्षण आणि सुरक्षिततेबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आली.

व्यापार-उद्योगाला चालना

या नव्या रेल्वेमार्गामुळे कोकणातील बंदरे थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडली जाणार आहेत. विशेषतः साखर उत्पादनासाठी ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बंदरांदरम्यान मालवाहतूक अधिक वेगवान होणार आहे. विजयदुर्ग बंदरातून साखरेची मळी मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते; या मार्गामुळे निर्यातीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

दीर्घकालीन मागणीची पूर्तता

कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.  तत्कालीन रेल्वेमंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांनी २६ फेब्रुवारी २०१६ रोजी या नव्या रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. आता बोर्ड आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

“वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जोडले जातील. प्रकल्पाला रेल्वे बोर्ड आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून तो लवकरच कार्यान्वित होईल,” असे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular