पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर
पन्हाळा तालुक्यातील रविवार पेठ येथे झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाने कारवाई करत ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. जुन्या सर्व्हे क्रमांक ४५ व नवीन सर्व्हे क्रमांक २८ मधील एकूण ४१ झाडांची विनापरवाना तोड झाल्याचे वनविभागाच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी अॅड. सुरेश सदाशिव कदम यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार वनपाल सागर पाटाडे व वनरक्षक राहुल जोंनवाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा व अहवाल सादर केला. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल (वृक्षतोडीचे विनियमन इ.) अधिनियमानुसार प्रति झाड एक हजार रुपये याप्रमाणे ४१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
वनविभागाच्या प्रेस नोटनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पन्हाळा परिमंडळ वनाधिकाऱ्यांकडे पावती क्रमांक ३२०२४६ अन्वये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.