कोल्हापूर : आकृतीबंधातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन हिस्सा पोटी मिळणारे वेतन वेळेत मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी शासन अनुदानाची रक्कम पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊन तेथून संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. या प्रक्रियेमुळे वेतन मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली होती.
ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली आता शासन हिस्सा थेट जिल्हास्तरावरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या पद्धतीनुसार नोव्हेंबर 2025 महिन्याचे वेतनापोटी शासन हिस्सा म्हणून प्राप्त झालेली सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम जिल्ह्यातील आकृतीबंधातील कार्यरत 1937 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. कर्मचारी संघटनेच्या वतीने हा प्रश्न तातडीने मार्गी लावल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे आभार मानून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.