Wednesday, April 15, 2026
HomeEducationसमाज विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची – लेफ्टनंट कर्नल राहुल माने

समाज विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची – लेफ्टनंट कर्नल राहुल माने

कोल्हापूर : सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत आयोजित गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निवृत्त लेफ्टनंट कर्नल राहुल माने यांनी समाज विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.

आपल्या प्रदीर्घ सैनिकी सेवेतले अनुभव तसेच सध्या कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून बजावत असलेल्या जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्याने जास्तीत जास्त वाचन करणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि अद्यावत तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे ही यशाची त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वी आयुष्यासाठी शिस्त आणि कर्तव्यपालन या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असून, या सवयी तरुणांनी अंगीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतुल देसाई यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिज्ञा नाट्य रंग संस्थेचे प्रशांत जोशी यांचा सामाजिक योगदानाबद्दल आणि कृष्णा माळी यांचा घोटणे ग्राम पर्यटन विकासातील उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले यांनी केले. अशा उपक्रमांमुळे होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश आवटे यांनी मांडले.

कार्यक्रमादरम्यान ‘सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज’ संस्थेमार्फत ‘वॉटर अँड जेंडर’ या विषयावरील पोस्टर व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण शिबीर, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नीलोफर अजगेकर व पल्लवी पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास डॉ. सोनिया राजपूत, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, संचालक डॉ. आर. के. टेलर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे व सचिव सीए ऋषिकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular