कोल्हापूर प्रतिनिधी:
करवीर तालुक्यातील विविध विकास कामे व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला पंचायत समिती करवीरचे सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दिपाली पाटील तसेच सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती सादर केली.
यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी घरकुल योजना, बळीराजा पाणंद योजना आदी शासकीय योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकांपर्यंत विनाविलंब आणि प्रभावीपणे पोहोचवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, पंचायत समिती करवीरच्या इमारत व जागेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्याशी चर्चा करून लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमुळे करवीर तालुक्यातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.