Friday, September 4, 2026
HomePoliticalशक्तीपीठ महामार्गाच्या वादातून कोल्हापुरात राडा; शेट्टी-क्षीरसागर समर्थक आमनेसामने

शक्तीपीठ महामार्गाच्या वादातून कोल्हापुरात राडा; शेट्टी-क्षीरसागर समर्थक आमनेसामने

कोल्हापूर : प्रतिनिधी

शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धाचे पडसाद आता रस्त्यावर उमटले आहेत. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असताना शेट्टी आणि क्षीरसागर समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. आंदोलनानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर क्षीरसागर समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून आमदार क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना “सरकार शेट्टींना उलटे टांगेल,” असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी, “टक्केवारीत अडकलेल्या क्षीरसागर यांनी हिंमत असेल तर उलटे टांगून दाखवावे,” असा पलटवार केला होता.

या वक्तव्याच्या निषेधार्थ काल शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.

आंदोलन आटोपल्यानंतर स्वाभिमानीचे कार्यकर्ते घरी जाण्यासाठी निघाले असताना संतप्त क्षीरसागर समर्थकांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा हाणामारीचा प्रसंग टळला. पोलिसांनी क्षीरसागर समर्थकांना महापालिका चौक परिसरात रोखत काही जणांना ताब्यात घेतले आहे.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय वाकयुद्धाला आता समर्थकांच्या संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular