वाकरे / प्रतिनिधी:
जिद्द, मेहनत आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम घडवत वाकरे गावची कन्या कुमारी प्रतीक्षा संजय तोडकर हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून ठाणे ग्रामीण पोलीस दलात आपले स्थान पक्के केले आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या प्रतीक्षाने मनाशी घेतलेला निर्धार आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर हे यश मिळवले असून तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतीक्षाने क्रीडांगणावर घाम गाळत आणि लेखी परीक्षेची मनापासून तयारी करत आपल्या स्वप्नाला आकार दिला. तिच्या या प्रवासात तिचे वडील संजय तोडकर यांचे मोठे योगदान आहे. ते एसटी महामंडळात गगनबावडा हजारामध्ये वाहक म्हणून कार्यरत असून शालेय जीवनात ते स्वतः उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्रामाणिक सेवा आणि कुटुंबासाठी केलेले कष्ट यामुळे त्यांनी मुलीला सतत प्रोत्साहन दिले.
निवडीचा निकाल समजताच प्रतीक्षाने आनंद साजरा करण्याचा आगळावेगळा मार्ग निवडला. ती थेट वाकरे फाटा येथे पोहोचली. गगनबावड्याकडून कोल्हापूरकडे जात असलेल्या एसटी बसला थांबवून तिने आपल्या वडिलांचे चरण स्पर्श केले आणि त्यांच्या कपाळावर गुलाल लावून आनंद व्यक्त केला. हा क्षण पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे करणारा ठरला.
यावेळी प्रतीक्षाने केवळ वडिलांनाच नव्हे, तर त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या एसटी बसलाही मानाचा मुजरा केला. “या एसटीमुळेच आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला, माझ्या यशात तिचाही मोठा वाटा आहे,” असे म्हणत तिने बसला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्यानंतरही आपल्या मुळाशी जोडलेली राहून वडील आणि त्यांच्या सेवेला दिलेला हा मान हा खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे. प्रतीक्षाच्या या भावनिक आणि आगळ्यावेगळ्या कृतज्ञतेच्या कृतीची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात रंगत असून, तिचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतीक्षाला आई वडील यांच्याबरोबरच आजोबा कुंभी बँकेचे माजी संचालक व शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल गोविंद तोडकर चुलते तानाजी तोडकर यांचे प्रोत्साहन लाभले .