Tuesday, May 5, 2026
HomePoliticalकोल्हापूरमध्ये ‘छत्रपति’ ऐवजी ‘छत्रपती’ नाव दुरुस्तीसाठी नगरसेवक सचिन चौगले यांचा पाठपुरावा

कोल्हापूरमध्ये ‘छत्रपति’ ऐवजी ‘छत्रपती’ नाव दुरुस्तीसाठी नगरसेवक सचिन चौगले यांचा पाठपुरावा

कोल्हापूर, दि. ५ मे २०२६ — कोल्हापूर महानगरपालिकेच्या २० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने काँग्रेसचे नगरसेवक सचिन हरीश चौगले यांनी पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी पुतळा परिसरातील ‘छत्रपति शिवाजी मार्केट’ या नावात ‘छत्रपति’ असा चुकीचा उल्लेख अनेक वर्षांपासून होत असल्याचा मुद्दा चौगले यांनी सभेत उपस्थित केला होता. ‘छत्रपति’ ऐवजी योग्य ‘छत्रपती’ असा शब्दप्रयोग करून मार्केटचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्केट’ असे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रस्तावाला सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती.

मात्र, ठराव मंजूर होऊनही प्रत्यक्षात नावात कोणताही बदल न झाल्याचे दिसून येत असल्याने चौगले यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन सादर केले. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, माजी नगरसेवक अजित पोवार धामोडकर, नगरसेवक सचिन शेंडे, संदीप बिरांजे तसेच नगरसेविका दिपाली घाटगे उपस्थित होते.

निवेदनात, “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा सन्मान राखण्यासाठी मार्केटचे नाव तातडीने दुरुस्त करून ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्केट’ असे अधिकृत नामकरण करण्यात यावे,” अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी या मागणीची तातडीने दखल घेत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular