पुणे दिनांक 5 ऑक्टोबर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अर्ज सादर करण्यात आला. याप्रसंगी महायुतीच्या नेत्यांची मांदियाळी होती.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच विविध भागांतील गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोणतेही मोठे शक्तिप्रदर्शन न करता स्वेच्छेने उपस्थित राहिलेल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी महिला शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. शिक्षकांची सेवा सुरक्षा, शैक्षणिक धोरणे व शिक्षकांच्या हक्कांसाठी विधिमंडळात प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम प्रतिनिधित्व मिळवून देण्याची संधी असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.
यावेळी राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पुणे महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. राजेंद्र शेजवळ, संस्थेचे आजीव सेवक आर. के. भोसले, संस्थेचे विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती यशवंत माने, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव एस. एम. गवळी, पुणे विभागाचे विभागप्रमुख अनिल साकोरे तसेच विविध शिक्षक संघटनेचे नेते, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, महिला शिक्षक स्वच्छेने दाखल झाले होते.