कोल्हापूर, प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत फिर्यादीच्या मित्रालाच अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिरेश्वर येथील शिव माळवाडीमध्ये राहणारे संभाजी शिवाजी काशीद हे ३ जून रोजी कुटुंबासह शेतात भात पेरणीच्या कामासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा उघडून तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार सोमराज पाटील व प्रकाश कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, ही चोरी फिर्यादीचा मित्र वैभव विश्वास पडवळे (वय २९, रा. माळवाडी, बहिरेश्वर, ता. करवीर) याने केली असून तो चोरीचे दागिने विक्रीसाठी खुपिरे फाटा येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खुपिरे फाटा परिसरात सापळा रचला. संशयित वैभव पडवळे हा एसटी बसमधून उतरून खुपिरेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले सोन्याचे झुबे, कानातील वेल तसेच चांदीचे पैजन असा चोरीचा मुद्देमाल आढळून आला.
चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त दागिन्यांची किंमत १ लाख ४४ हजार २५० रुपये इतकी आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.