कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर चेअरमन निवडीची विशेष सभा खोळंबल्याच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे १२ नवनिर्वाचित संचालक बेपत्ता असल्याची लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित चेअरमन निवडीच्या विशेष सभेपासून १२ संचालक बेपत्ता आहेत. यामध्ये १. श्री. राजेश नरसिंगराव पाटील, २. श्री. राहुल पी. एन. पाटील, ३. श्री. रणजित के. पी. पाटील, ४. श्री. रणजित दिलीपराव पाटील, ५. श्री. अंबरिशसिंह संजय घाटगे, ६. श्री. चेतन अरुण नरके, ७. श्री. अजित शशिकांत नरके, ८. श्री. अजित पांडुरंग पाटील, ९. श्री. वीरेंद्र संजय मंडलिक, १०. श्री. मदन बाबूराव देसाई, ११. श्री. अमर पाटील आणि १२. श्री. कर्णसिंह गायकवाड यांचा समावेश आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि गोकुळच्या चेअरमन निवडीतील कोरम पूर्ण होण्यासाठी पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना बैठकीत हजर करावे, अशी ‘मिसिंग’ तक्रार त्यांनी दिली.
शिवाजीराव परुळकर यांनी नमूद केले की, हे संचालक सहलीला गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे; परंतु चेअरमन निवडीची महत्त्वपूर्ण बैठक सोडून त्यांना कोणी सहलीवर नेले, याचा शोध पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. दिलीप पवार यांनी ताकीद दिली की, या तक्रारीचा तपास तातडीने व जलदगतीने व्हावा, अन्यथा संघाचे ५.५ लाख दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन तीव्र ठिया आंदोलन छेडतील.
दरम्यान, गोकुळमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकारामुळे अखंड महाराष्ट्रात कोल्हापूरची मोठी बदनामी होत असल्याची तीव्र खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या निषेधार्थ उद्या सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला असून, या संघर्ष मोर्चामध्ये कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवेदन स्वीकारताना संबंधित अधिकारी कागलकर यांनी हे प्रकरण गंभीर असून पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन पुढील कायदेशीर कारवाईची विनंती करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
या वेळी टी. एस. पाटील, वसंतराव पाटील, रवी जाधव, संजय साठे, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, मधुकर पाटील यांच्यासह डाव्या आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.