Sunday, June 7, 2026
HomePoliticalशेतकरी, शेती आणि कृषी संस्कृतीच्या प्रश्नांवर तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात परखड मंथन...

शेतकरी, शेती आणि कृषी संस्कृतीच्या प्रश्नांवर तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात परखड मंथन पी. साईनाथ, आसाराम लोमटे आणि राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात

जयसिंगपूर, दि. ७ जून : विकासाच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना भूमिहीन आणि कंगाल करण्याचा डाव रचला जात आहे, असा घणाघाती आरोप ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक पी. साईनाथ यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे आणि स्वागताध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही शेतकरी, शेती आणि कृषी संस्कृतीच्या प्रश्नांवर परखड भूमिका मांडत सरकारच्या धोरणांवर टीका केली.

जयसिंगपूर येथे दिवसभर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या संमेलनाला साहित्यिक, शेतकरी, अभ्यासक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संमेलनाची सुरुवात खिलार बैलजोडी आणि नांगराच्या फाळाच्या पूजनाने करण्यात आली. ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाने संमेलनाच्या वैचारिक स्वरूपाला सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले.

उद्घाटक पी. साईनाथ यांनी आपल्या भाषणात देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी वर्गासमोरील वाढत्या संकटांचा परखड आढावा घेतला. ते म्हणाले, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार आणि कार्पोरेट शक्तींच्या संगनमतातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आखला जात आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतीमधून माणसे बाहेर पडू लागली आहेत, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.”

कार्पोरेट क्षेत्राला मिळणाऱ्या विशेष सवलतींवर भाष्य करताना साईनाथ म्हणाले, “कार्पोरेट जगताची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातात, मात्र त्यावर कधीच चर्चा होत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. देशाच्या अन्नदात्याला न्याय मिळवून देण्यासाठी ही मानसिकता बदलावी लागेल.”

संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेती आणि साहित्य यांचे परस्परसंबंध अधोरेखित केले. “शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर आपल्या जीवनाचा प्राण आहे. शेती ही आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. शेतकरी जगला तरच समाज जगेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये,” ज्यावेळेस देशात १९७२ साली दुष्काळ पडला तेंव्हा शेतकऱ्यांनी घरातील धान्य संपत आले होते तेंव्हा स्वतः एकवेळ उपाशी राहून त्यांनी बियाणेसाठी राखीव धान्य शिल्लक ठेवले म्हणूनच दुष्काळानंतरही शिवार फुलले असे ते म्हणाले.

शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करताना लोमटे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.” साहित्यिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, “साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत. अन्यायकारक व्यवस्थेविरोधात साहित्याने आवाज उठवला पाहिजे. शेतकऱ्यांनी जागे होऊन संघटित होण्याची गरज आहे.”

स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. “महात्मा फुलेंचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुन्हा एकदा या सरकारवर उगारण्याची गरज आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प रेटले जात आहेत. गरज नसताना सुपीक शेती संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले.

शेट्टी पुढे म्हणाले, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. आम्ही ती कदापि सहन करणार नाही. अनेक सरकारे आली आणि गेली, पण शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. कार्पोरेट कल्याण समिती असल्याप्रमाणे कार्पोरेट क्षेत्राचेच हित जोपासले जात आहे. शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे.”

देशातील बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधताना त्यांनी सरकारला सवाल केला. “देशात बेरोजगारांच्या थव्यांच्या थवे तयार होत आहेत. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार काय करत आहे? शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी समाजात धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे. सरकारने देशाच्या अन्नदात्याकडे आणि युवकांच्या भवितव्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,” असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील यांना ‘स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ शेतकरी चळवळ कार्यकर्ते जयकुमार कोले यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारिता मधला पी साईनाथ यांना स्वाभिमानी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दुपारच्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी’ आणि ‘हास होत चाललेली कृषी संस्कृती व कृषी सर्जनशीलता’ या विषयांवर परिसंवाद झाले. प्रा. डॉ. गौतमपुत्र कांबळे, प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम, प्रसाद कुलकर्णी, विजय चोरमारे, नामदेव माळी, प्रा. संदीप जगताप आणि डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. शेतकरी चळवळींचा इतिहास, कृषी संस्कृतीचे जतन, ग्रामीण जीवनातील बदल आणि साहित्याची सामाजिक जबाबदारी यांवर सखोल चर्चा झाली.

सायंकाळी झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्षस्थानी स्वाती शिंदे-पवार होत्या. विविध कवींनी शेती, माती, ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि सामाजिक वास्तव यांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी महावीर अक्कोळे डॉ. सुभाष अडंदडे, गोमटेश्वर पाटील, प्राध्यापक शांताराम कांबळे, प्रकाश पोपळे , विठ्ठल मोरे, भगवान काटे , राजेंद्र गड्यान्नावर , प्रवक्ते अनिल पवार , घनशाम चौधरी , बापूसाहेब कारंडे , रविंद्र इंगळे , सुरेश काळे , अजित पोवार , राजाराम देसाई , आधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular