Saturday, June 13, 2026
HomeAdministrationखुपीरे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन बांधकामाची चौकशी; आरोग्य उपसंचालकांची अचानक तपासणी

खुपीरे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन बांधकामाची चौकशी; आरोग्य उपसंचालकांची अचानक तपासणी

कोल्हापूर, प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य उपसंचालक डॉ.दिलीप माने यांनी शुक्रवारी दुपारी अचानक तपासणी केली. यावेळी रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली.

रुग्णालयाच्या वाढीव इमारत बांधकामाबाबतची आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच गरज नसताना मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचेही निदर्शनास आले. फरशी व विद्युत व्यवस्था नसल्याने ही जागा धूळ खात पडून आहे.

बांधकामासाठी किती निधी मंजूर झाला, तो कोठून प्राप्त झाला आणि त्याचा वापर कसा करण्यात आला याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने संशय निर्माण झाला आहे. शासकीय निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने डॉ. माने यांनी या वाढीव बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वर्षभरापूर्वी खुपीरे येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत हे काम रखडले होते. तपासणीदरम्यान डॉ. माने यांनी नवीन इमारतीत उपलब्ध जागेची पाहणी करून तेथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी योग्य जागा निश्चित केली. संबंधित काम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या विविध सुविधांची पाहणी करण्यात आली.

आरोग्य उपसंचालकांच्या या कारवाईमुळे खुपीरे येथील डायलिसिस सेंटरचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांचे खुपीरे येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular