Friday, July 3, 2026
HomeWheatherकोल्हापुरात पावसाची धो-धो सुरूच; पाच बंधारे पाण्याखाली, वाहतूक बंद

कोल्हापुरात पावसाची धो-धो सुरूच; पाच बंधारे पाण्याखाली, वाहतूक बंद

कोल्हापूर, दि. ३ जुलै : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. सततच्या पावसामुळे प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

इचलकरंजी, रुई, शिंगणापूर, यवलुज आणि शिरोळ येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची ये-जा होत असते. मात्र पाण्याचा वेग वाढल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

कोल्हापूर शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जिल्ह्यातील डोंगराळ भागात जोरदार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आज सकाळी कोल्हापूर शहराजवळील राजाराम बंधाऱ्यावरही पाणी आल्याने तो पूर्णपणे पाण्याखाली गेला. धोका असूनही काही दुचाकीस्वारांनी पाण्यातूनच बंधारा पार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. वाहत्या पाण्याचा वेग लक्षात घेता हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत नागरिकांनी जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत, असे आवाहन केले आहे.

शिंगणापूर बंधाऱ्यावरही पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही नागरिक पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. तसेच सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular