Sunday, July 12, 2026
HomeCrimeव्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे चालणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; करवीर पोलिसांची धडक कारवाई

व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे चालणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; करवीर पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापूर, दि. १२ जुलै : व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य सूत्रधारासह आणखी तीन आरोपी फरार आहेत.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध वेश्याव्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, वाशी गाव हद्दीतील सनराईज लॉजिंगमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरू आहे. या व्यवसायासाठी पुणे व मुंबई येथून महिलांना आणून त्यांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवून ग्राहकांना आकर्षित केले जात होते.

या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून ११ जुलै रोजी सनराईज लॉजिंगवर छापा टाकला. कारवाईदरम्यान सागर प्रभाकर कांबळे (वय ४०, रा. मिनचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (वय ३५, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

छाप्यात ६,९०० रुपये रोख रक्कम, चार मोबाईल फोन, निरोधाची पाकिटे, ७२ निरोध असलेला बॉक्स, रजिस्टर, भाडेकराराची कागदपत्रे आदी साहित्य जप्त करण्यात आले.

चौकशीत मुख्य सूत्रधार शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड) याने “सागर पाटील फ्रेंड सर्कल” नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावरील सदस्यांशी संपर्क साधत ग्राहकांना सनराईज लॉजमध्ये बोलावले जात असल्याचे निष्पन्न झाले. या व्यवसायात सुहास निचीते (रा. सोळांकूर, ता. राधानगरी) व विक्रम दिनकर कांबळे (रा. कासारवाडा, ता. राधानगरी) यांचीही मदत घेतली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. हे तिघे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार तसेच करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular