Tuesday, July 14, 2026
HomePolitical'गोकुळ'नंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी लावणार; शिवाजीराव पाटील यांचा मंत्री मुश्रीफांना इशारा

‘गोकुळ’नंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी लावणार; शिवाजीराव पाटील यांचा मंत्री मुश्रीफांना इशारा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

‘गोकुळ’ दूध संघाच्या चौकशीनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कारभाराचीही चौकशी लावणार असून, शेतकऱ्यांच्या जीवावर पैसे खाऊन गब्बर होणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिवाजीराव पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली असून, ‘गोकुळ’च्या राजकारणात महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेरे सरंजाम प्रश्न निकाली निघाल्याबद्दल रवळनाथ मंदिर सभागृहात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर भाष्य करताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केलेल्या “गोकुळमधील माझे ज्ञान काय आहे?” या टोमण्याला प्रत्युत्तर दिले. “गोकुळमधील संस्थांची चौकशी लावून काही संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे माझे गोकुळमधील ज्ञान काय आहे, हे सर्वांना समजले आहे,” असे ते म्हणाले.

तसेच गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना आणि आजरा येथील वसंतराव देसाई साखर कारखान्यांचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “या दोन्ही कारखान्यांना जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा झाला असतानाही ते कर्जाच्या खाईत कसे गेले? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

हेरे सरंजाम प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अपुरे कागदपत्रे हा या प्रश्नातील प्रमुख अडथळा होता. माजी आमदार नरसिंगराव पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनाही हा प्रश्न सोडविण्यात यश आले नव्हते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला, असे त्यांनी सांगितले.

राजकीय प्रतिस्पर्ध्यांवरही त्यांनी टीका केली. “तीन वेळा वडील आणि एकदा स्वतः आमदार राहिलेल्या राजेश पाटील यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी थांबलो नाही. कोरोना काळात कुटुंब बाजूला ठेवून समाजासाठी काम केले. त्यामुळेच जनतेने मला स्वीकारले,” असा टोला त्यांनी लगावला.

विकासकामांबाबत बोलताना आमदार पाटील यांनी, “माझ्या कामाची ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा डंका वाजेल. भडगाव पुलाचे श्रेय खासदार शाहू महाराज यांना जाते. तसेच आगामी ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्तेत राहण्याबरोबरच या विभागाला अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार,” असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर विभागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular