कोल्हापूर/आजरा, दि. १३ : बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक भेट न देता, पालकमंत्र्यांनी थेट भातखाचरात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला. त्यानंतर हातात भाताची रोपे घेत महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या सोबतीने पारंपरिक पद्धतीने रोपलावण केली. शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट आपल्यासोबत चिखलात काम करत असल्याचे पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.
रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यावेळी शेतात प्रत्यक्ष ‘जीवामृत’ तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जीवामृतासाठी लागणारे आवश्यक घटक, त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांसाठी होणारे फायदे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होत जीवामृत निर्मितीची सविस्तर माहिती घेतली व नैसर्गिक शेतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले.
शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी गाव परिसरातील पद्धतीने, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसूनच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या जेवणादरम्यान रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या.
यावेळी चर्चेतील प्रमुख मुद्दे – शासकीय योजनांची तळागाळातील अंमलबजावणी, आधुनिक व पारंपरिक शेती अवजारांची उपलब्धता, दर्जेदार बियाणे आणि खतांचा वेळेत पुरवठा, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील आव्हाने यावर चर्चा झाली.

