Thursday, September 24, 2026
HomeAgricultureजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे - संतोष मोरे

जैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे – संतोष मोरे

कोल्हापूर दि : 24 :  रासायनिक खतांच्या अति वापरामुळे सध्या शेतीतील मातीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताला फारसे प्राधान्य न देता जैविक शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सहा.कृषी अधिकारी संतोष मोरे यांनी केले. शासनाच्या ‘लोकसंवाद’ या उपक्रमांतर्गत मौजे खुपिरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. 

 यावेळी माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीपती माधुरी पाटील – निकम,उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक(उपजीविका) प्रकाश लाड,जिल्हा संसाधन व्यक्ती रवींद्र शिरोळकर तसेच पाणी फाउंडेशन चे फिल्ड ऑफिसर ओंकार सुर्वे उपस्थित होते.

       श्री मोरे म्हणाले, महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत साधारणतः शंभरहून अधिक योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

 श्रीमती माधुरी पाटील म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गंत शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास शासनाकडून किमान दोन लाखापर्यंत मदत मिळते तसेच अपघातग्रस्त झाल्यास 50 हजारांपर्यंत मदत मिळते तर रवींद्र शिरोळकर म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत,त्याकरिता कृषी विभागाकडून विविध योजनांसाठी साधारणतः 35 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री अन्न सुक्ष्म प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कागदपत्रे, तांत्रिक बाबी तसेच शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते असल्याची माहिती दिली.

             यावेळी येथील खुपिरे येथील माऊली शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने विविध प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केली. करवीर तालुक्यामध्ये महिला व पुरुषांचे सुमारे 96 शेतकरी गट कार्यरत आहेत.

यावेळी माऊली शेतकरी गटाचे अध्यक्ष संजय पाटील, खुपिरेच्या कृषी सहाय्यक उर्मिला सरनाईक, पूजा खोत, दामू दाते, सतीश शेंडगे यांच्यासह इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular