Friday, September 25, 2026
HomeCrimeकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बॅलेंसिंग गणेशमूर्ती कोसळली, गोखले कॉलेज चौकातील घटना

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बॅलेंसिंग गणेशमूर्ती कोसळली, गोखले कॉलेज चौकातील घटना

कोल्हापूर : करवीरनगरीत गेल्या बारा दिवसांपासून भक्तिभावाने पूजलेल्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिला जात असतानाच गोखले कॉलेज चौकात मोठी दुर्घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फुटी बॅलेंसिंग गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अचानक रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाली असून गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.

वाय. पी. पोवार नगर मंडळाने यंदा ‘करवीरचा राजा’ म्हणून ओळखली जाणारी २१ फुटी भव्य बॅलेंसिंग गणेशमूर्ती साकारली होती. एका पायावर उभी असलेली आणि पुढील बाजूस काहीशी झुकलेली ही मूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. मूर्ती मिरवणूक मार्गावरून नेत असताना गोखले कॉलेज चौकात अचानक तिचा तोल गेला आणि काही क्षणांतच महाकाय मूर्ती रस्त्यावर कोसळली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मूर्ती आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती. गोखले कॉलेज चौकाजवळ मार्गावरील विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानंतर मूर्तीचा तोल गेल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. मूर्ती कोसळताच मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता पसरली. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले, तर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती सुरळीत करण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मूर्ती रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.

मंडळाचा महावितरणवर आरोप

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरील विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या हटविण्याबाबत महावितरणकडे यापूर्वीच विनंती करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, ही कामे पूर्ण न झाल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, महावितरणने हा आरोप फेटाळला आहे. मिरवणुकीपूर्वी मुख्य विसर्जन मार्गावरील आवश्यक कामे तसेच पोलीस प्रशासनाने सूचित केलेली कामे आणि आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

महावितरणची २१ पथके तैनात

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर शहरात महावितरणकडून २१ ठिकाणी २४ अभियंते आणि २२५ जनमित्रांची पथके तैनात करण्यात आली आहेत. मिरवणूक सुरू होण्यापूर्वीपासून ती संपेपर्यंत ही पथके क्षेत्रावर उपस्थित असल्याचे महावितरणने सांगितले.

वाय. पी. पोवार नगर मंडळाची मूर्ती मंडळापासून गोखले कॉलेजपर्यंत आणताना महावितरणच्या उद्यमनगर शाखेतील जनमित्र स्वप्नील जाधव, दीपक थोरवत, सूरज चव्हाण आणि दिग्विजय जांभळे हे सुरुवातीपासून मंडळासोबत उपस्थित असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले.

महावितरणच्या म्हणण्यानुसार, गोखले कॉलेज येथे घडलेल्या घटनेत महावितरणचा कोणताही दोष किंवा निष्काळजीपणा नसून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मूर्ती आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती.

यंदा पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर या मंडळाने आगमन मिरवणूकही काढली नव्हती. विसर्जनावेळी आवश्यक ती खबरदारी घेत असतानाही ही घटना घडल्याने मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांमध्ये दु:खाचे वातावरण निर्माण झाले.

अरुंद रस्ते, विद्युत तारा, झाडांच्या फांद्या आणि रस्त्यावरील खड्डे यांसारख्या अडचणींमुळे मोठ्या आकाराच्या बॅलेंसिंग मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीसमोरील आव्हाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular