कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदार महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा क्रमांक ३७४/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३(५)) चा तपास सुरू असताना आरोपी अवधुत लहू धुरे (वय २३, रा. फये, ता. भुदरगड) हा नवीन वाशी नाका येथील महापालिकेच्या पंपिंग हाऊसजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ४ लाख ६ हजार ९५९ रुपये किमतीचे ३२.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि १.०२० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली.
न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतरच्या तपासात त्याने १ लाख ४३ हजार ९९४ रुपये किमतीचा १०.३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस गारगोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याची कबुली दिली. संबंधित नेकलेस जप्त करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
तपासात आरोपी अवधुत धुरे आणि त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे (वय २४, मूळ रा. गारगोटी, सध्या महेश्वर कॉलनी, नागदेववाडी, करवीर) यांनी संगनमताने शेजारी राहणाऱ्या शितल रामचंद्र गावडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
मुख्य आरोपी अवधुत धुरे याच्याविरुद्ध यापूर्वी मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे आणि श्रीधर जाधव यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.