Tuesday, July 14, 2026
HomePoliticalशिवाजीराव पाटलांचा पुन्हा मुश्रीफांवर निशाणा; जिल्हा बँक चौकशीच्या घोषणेने कोल्हापुरातील राजकारण तापले

शिवाजीराव पाटलांचा पुन्हा मुश्रीफांवर निशाणा; जिल्हा बँक चौकशीच्या घोषणेने कोल्हापुरातील राजकारण तापले

कोल्हापूर | दत्तात्रय बोरगे

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात रंगलेला राजकीय संघर्ष वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर शांत झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता आमदार शिवाजीराव पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) चौकशीची मागणी करत पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे गोकुळमधील सत्ताधारी गटाला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या चौकशीची घोषणा करून शिवाजीराव पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रभावी नेते असून, त्यांना थेट आव्हान देण्यामागे मोठे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपची जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्थांवर प्रभाव वाढवण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या सहकारी संस्था मानल्या जातात. त्यामुळे या संस्थांवरील नियंत्रण मिळवणे हे व्यापक राजकीय धोरणाचा भाग असू शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

कागल विधानसभा मतदारसंघासह आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाजपचे संघटन बळकट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कागलचे राजे समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेशही या व्यापक राजकीय समीकरणाचा भाग असल्याची चर्चा आहे.

आमदार शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि आक्रमक शैलीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा रंगली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या चौकशीबाबत अधिकृत पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसून, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular