पन्हाळा (प्रतिनिधी):
नरवीर शिवा काशिद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथी निमित्त पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर त्यांच्या समाधी स्थळ गडावरील पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमीची अलोट गर्दी झाली होती. सर्व शिवप्रेमी यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी , शिवा काशीद की जय बाजीप्रभू देशपांडे की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुण्यतिथीनिमित्त येथील समाधीस्थळी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी सांस्कृतिक हॉल बस स्थानक पन्हाळा येथे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. स्वाती पाटील यांनी आपल्या मनोगतात देशसेवेची प्रेरणा नरवीर शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानातून घ्यावी, असे सांगत इतिहासातून राष्ट्रभक्ती, त्याग आणि कर्तव्यभावनेचे संस्कार प्रत्येक पिढीवर व्हायला हवेत, असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा आणि पराक्रम हे आजच्या तरुणांसाठी आदर्श असल्याचे सांगितले.
यावेळी समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ समाजभूषण’ पुरस्काराने पन्हाळ्याचे बाबासाहेब काशिद, तर ‘समाजरत्न’ पुरस्काराने राशिवडे येथील दिगंबर टिपुगडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या नाभिक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे नाभिक युवा संघटना, कोल्हापूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, माजी पोलीस पाटील भीमराव काशिद, प्रदेश कोषाध्यक्ष रामदास पवार (लातूर), पुणे जिल्हाध्यक्ष निलेश पांडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रभाकर भालेकर, गोमंतक नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय गोवेकर, जिल्हाध्यक्ष मारुती टिपुगडे, महिला जिल्हाध्यक्ष मेघाराणी जाधव, जिल्हा सरचिटणीस मयूर रोकडे, संवर्धन समितीचे अध्यक्ष गजानन शिंदे, पन्हाळा तालुका अध्यक्ष संजय रोकडे, पन्हाळा शहर अध्यक्ष रवि काशिद यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.