कोल्हापूर:
दि. १४/०७/२०२६ रोजी मा. वनपरिक्षेत्र पन्हाळा अंतर्गत वनपाल पन्हाळा व वनरक्षक राक्षी-पिंपळे हे सातवे ते वाघबीळ या डांबरी रस्त्यावर नियमित गस्त घालत असताना टेम्पो क्रमांक MH-09 EM 6162 हा संशयावरून थांबवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित टेम्पोमध्ये निर्बंधित व अनिर्बंधित जातींचे चिरीव वेस्टेज जळाऊ लाकूड वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याबाबत वाहन चालक श्री. अशोक बाजीराव खोत (रा. वेखंडवाडी, ता. पन्हाळा) तसेच टेम्पो मालक श्री. कृष्णा दत्तू खोत यांच्याकडे लाकूड वाहतुकीचा वैध परवाना मागितला असता, त्यांच्याकडे कोणताही वैध वाहतूक परवाना उपलब्ध नव्हता.
त्यामुळे विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक श्री. अशोक बाजीराव खोत व टेम्पो मालक श्री. कृष्णा दत्तू खोत यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम ४१(२)(ब) अन्वये वनरक्षक राक्षी यांचेकडील वनअपराध पहिले प्रतिवृत्त क्रमांक T-०५/२०२६, दिनांक १४/०७/२०२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच संबंधित टेम्पो व त्यामधील लाकूड माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक, कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील तसेच मा. सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) श्रीमती प्रियांका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पन्हाळा श्री. अजित माळी, वनपाल पन्हाळा श्री. सागर पताडे आणि वनरक्षक राक्षी श्री. योगेश पाटील यांनी केली.