पन्हाळा (प्रतिनिधी): पन्हाळा तालुक्यातील खडेखोळवाडी येथे शेतीच्या मालकीच्या वादातून मामा-भाच्यात झालेल्या वादानंतर शेतातील भावाची झाडे उपटून नुकसान केल्याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पांडुरंग सदाशिव केसरकर (वय 46, रा. खडेखोळवाडी, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे. तर केरबा दादू गवळी (वय 80, रा. बोरीवडे, ता. पन्हाळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 324(4) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने मामा-भाचे असून, त्यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. गुरुवारी (दि. 16 जुलै) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास खडेखोळवाडी येथील ‘नाळवावडा’ नावाच्या शेतात आरोपी आले. “हे शेत माझे आहे, तुम्ही मला फसवून हे शेत तुमच्या नावावर करून घेतले आहे,” असे म्हणत त्यांनी शेतातील भावाची झाडे उपटून टाकून फिर्यादीचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात दुपारी 12.59 वाजता अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.