Monday, July 20, 2026
HomeEducationकौशल्यातून स्वावलंबनाकडे; जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

कौशल्यातून स्वावलंबनाकडे; जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर, दि. १५ जुलै : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त CYDA व युथ एड फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्किल फॉर चेंज (Skill4Change)’ कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास, रोजगार व सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायबर कॉलेजच्या समाजकार्य विभागाचे प्रा. डॉ. दीपक भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण कायंदे (प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी.), सचिन श्रावस्ती (मॅनेजर, श्रावस्ती हॉस्पिटल, कोल्हापूर) तसेच अरिफ अत्तार (डीन व प्लेसमेंट ऑफिसर, सायबर कॉलेज, कोल्हापूर) उपस्थित होते.

यावेळी जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या २१ महिलांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला रिक्षाचालक प्रशिक्षण घेत असलेल्या ७ महिलांनी सॉफ्ट स्किल प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी महिलांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे महिलांसाठी रोजगार व स्वावलंबनाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. प्रवीण कायंदे यांनी एम.सी.ई.डी.च्या स्वयंरोजगार, उद्योजकता आणि विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत युवक-युवतींनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

युथ एड फौंडेशनचे सेंटर हेड भरत आवळे यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

कार्यक्रमादरम्यान “कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. बदलत्या रोजगार बाजारपेठेतील संधी, उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये आणि उद्योजकतेचे वाढते महत्त्व याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

LGBTQI उद्योजकता कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या संघर्षमय आणि प्रेरणादायी यशोगाथा सांगितल्या. सीड फंडिंगच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी मिळालेल्या मदतीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रशिक्षणार्थींनी कौशल्य विकास कार्यक्रमामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलोफर मुजावर यांनी केले, तर पल्लवी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, प्रशिक्षणार्थी, सहयोगी संस्था आणि सहभागींचे आभार व्यक्त करत भविष्यातही कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक उद्योजकतेसाठी अशाच प्रभावी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular