नंदवाळ (ता. करवीर) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त करवीर मतदारसंघातील “प्रति पंढरपूर” म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नंदवाळ येथे आमदार चंद्रदीप नरके यांनी वारकरी बांधवांसमवेत पायी वारी करत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. नंदवाळ फाट्यापासून मंदिरापर्यंत पायी चालत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेत सहभाग नोंदविला.
गेली अनेक वर्षे आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र नंदवाळ येथे वारकऱ्यांसोबत पायी वारी करण्याची परंपरा आमदार नरके यांनी कायम राखली असून, यंदाही त्यांनी वारकरी बांधवांसमवेत विठ्ठल नामाचा अखंड गजर करत भक्तिभावाने वारी केली.
टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार नरके यांनी पारंपरिक रिंगण सोहळ्यात सहभाग घेत वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेचा अनुभव घेतला. तसेच सहकाऱ्यांसह प्रसाद वाटपाच्या सेवेतही त्यांनी सहभाग नोंदविला.
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र नंदवाळ येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक नियोजनाबाबत सूचना दिल्या.
यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. विठ्ठल भक्तीचा संदेश समाजात समता, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करणारा आहे. विठुरायाच्या कृपेने सर्व जनतेला उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना.”
या प्रसंगी गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, कुंभी साखर कारखान्याचे संचालक बी. बी. पाटील, मोहन पाटील, बबन पाटील, अजित पाटील (हासूर), लक्ष्मण पाटील, संतोष पाटील, राजू पाटील, उत्तम पाटील, विनायक भोईटे यांच्यासह वारकरी, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.