Wednesday, September 9, 2026
HomePoliticalगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ रोजी निकाल

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ रोजी निकाल

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे तसेच सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑक्टोबर रोजी मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोककुमार गाडे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. **रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात गोकुळचे निवडणूक कार्यालय असणार असून, याच ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.**

### १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज

निवडणूक कार्यक्रमानुसार **१५ ते २२ सप्टेंबर** या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. **२३ सप्टेंबरला अर्जांची छाननी**, तर **२४ सप्टेंबरला वैध उमेदवारांची यादी** प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी **२५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर**पर्यंत मुदत देण्यात आली आहे. **९ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी** प्रसिद्ध होईल. त्यानंतर १८ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

### इच्छुकांच्या गाठीभेटींना वेग

गेल्या दोन महिन्यांपासून संभाव्य उमेदवारांनी संस्था सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यांसह दुर्गम भागातील दूध संस्थांशी संपर्क साधण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता प्रचाराचे नियोजन, उमेदवारांची जुळवाजुळव आणि राजकीय समीकरणे निश्चित करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

### २५ संचालकांची निवड

यंदाच्या गोकुळच्या संचालक मंडळात क्रियाशील सभासदांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील **२० संचालकांसह अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून १, महिला प्रवर्गातून २, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून १ आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून १**, असे एकूण **२५ संचालक** निवडले जाणार आहेत.

याशिवाय स्वीकृत संचालकांमध्ये **एक तज्ज्ञ संचालक, एक शासन नियुक्त संचालक आणि एक कार्यकारी संचालक** निवडण्यात येणार आहे.

### महायुतीसमोर उमेदवार निवडीचे आव्हान

निवडणूक जाहीर होताच महायुतीमध्ये इच्छुकांची स्पर्धा वाढण्याची चिन्हे आहेत. जागावाटपावरून अंतर्गत चुरस निर्माण होण्याची शक्यता असून, कोणत्या उमेदवारांना संधी द्यायची, याबाबत नेत्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी काळात गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular